पिंपरी-चिंचवड | ८ नोव्हेंबर २०२६ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांनी कोयाळी फाटा येथील ‘स्नेहवन’ संस्थेतील मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मुलांसोबत फराळाचा आनंद घेत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी टॅब भेट देण्यात आले.
आळंदीपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयाळी फाटा येथे अशोक देशमाने आणि अर्चना देशमाने हे दाम्पत्य स्नेहवन संस्था चालवते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी ही संस्था कार्यरत आहे.
आयुक्त दाम्पत्याने संस्थेच्या संपूर्ण परिसराची पाहणी करून विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. मुलांनीही संस्थेतील शाळा, प्रयोगशाळा आणि विविध प्रकल्पांची माहिती आत्मविश्वासाने दिली. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि संवादकौशल्याचे आयुक्त दाम्पत्याने कौतुक केले.
‘आत्मविश्वास कधीही हरवू देऊ नका; शिक्षण घेणे थांबवू नका,’ असा संदेश डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मुलांना दिला. शिक्षण घेताना कितीही अडचणी आल्या तरी जिद्द, सातत्य आणि नियमित अभ्यासाच्या बळावर यश मिळवता येते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुलांनी सरकारी अधिकारी होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, महापालिकेचे कामकाज आणि गरजू नागरिकांच्या समस्या कशा सोडवल्या जातात, याबाबत प्रश्न विचारले. डॉ. सूर्यवंशी यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत लष्करातील अधिकारी म्हणून झालेली निवड, सीमाशुल्क विभाग, सहकार विभाग तसेच जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तपदापर्यंतच्या प्रशासकीय प्रवासाची माहिती दिली.
सरकारी अधिकाऱ्यांनी मदतीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मुलांनी पुस्तकांविषयी आणि टेस्लासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी कौतुक केले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना डॉ. सूर्यवंशी यांनी कठीण परिस्थितीतही धैर्याने आणि संयमाने संकटांचा सामना करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे त्यांनी सांगितले.
डॉ. आरती सूर्यवंशी यांनीही मुलांशी मनमोकळा संवाद साधला. आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी स्वतःमधील क्षमता ओळखणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्नेहवनमधील मुलांच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांनी या मुलांमधून भविष्यात आयएएस अधिकारी, आयटी तज्ज्ञ, पत्रकार आणि मानसशास्त्रज्ञ घडू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
स्नेहवन संस्थेत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गोशाळा, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, ओपन जिम, कौशल्य विकास केंद्र, बेकरी प्रशिक्षण, एमपीएससी-यूपीएससी प्रशिक्षण केंद्र, विज्ञान प्रयोगशाळा आणि कंटेनर ग्रंथालय अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, यासाठी १५ प्रकारच्या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.
संस्थेच्या परिसरात ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते लावण्यात आलेल्या पेरूच्या झाडाची माहितीही मुलांनी आयुक्त दाम्पत्याला दिली.
दिवाळीनिमित्त झालेल्या या भेटीतून मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले. फराळासोबत टॅबची भेट देत आयुक्त दाम्पत्याने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न केला.