लग्नाचे आमिष दाखवून महिलेची आठ लाखांची फसवणूक!

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची आठ लाखांची फसवणूक!

काळेवाडी | २४ सप्टेंबर २०२६ : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आणि जास्त पैशांचे आमिष दाखवून एका ३४ वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करत तिच्याकडून ८ लाख १४ हजार रुपये घेत ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात इन्स्टाग्राम अकाउंटधारकासह मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घडला.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, hacker_hun_yar_01 या इन्स्टाग्राम अकाउंटधारक साहील वर्मा तसेच एका मोबाईल क्रमांकधारकाने तिच्याशी इन्स्टाग्रामवरून ओळख केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत जवळीक निर्माण करून तिच्याशी लग्न करण्याचे तसेच जास्त पैशांचे आमिष दाखवले.

आरोपीने भावनिक संवाद साधत वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी विविध कारणे सांगत तिच्याकडून पैसे मागितले. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने एकूण ८ लाख १४ हजार रुपये पाठवले. मात्र त्यानंतर आपली ऑनलाइन माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संपत्ती गुरव पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories