लाडकी बहिण योजनेत घोटाळा, अपात्र लाभार्थ्यांकडून जमा झालेली रक्कम परत घेतली जाणार
पुणे, ता. २५ - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा झाला आहे. या योजनेत पुरुषांच्या बँक खात्यातही पैसे जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच तब्बल १२,४१५ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतला आहे. अपात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांकडून (सरकारी कर्मचारी आणि पुरुष लाभार्थी) जमा झालेली रक्कम तात्काळ वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली.
अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला घेतल्यामुळे राज्याच्या तिजोरीला सुमारे १६५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या गैरप्रकारानंतर राज्य सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत.
त्यानुसार, आता स्थानिक पातळीवर अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांचा शोध घेणे, संबंधित व्यक्तींकडून पैसे वसूल करणे, फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुरू करणे, अशी कारवाई जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.