मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून मुक्त केलेले गिधाड हजारो किलोमीटरचा प्रवास करुन पोचले रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून मुक्त केलेले गिधाड हजारो किलोमीटरचा प्रवास करुन पोचले रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात
पुणे, ता.२५ - महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जानेवारी महिन्यात मुक्त केलेल्या एका गिधाडाने सुमारे ३,३३४ किलोमीटरचा प्रवास केला आहे. विविध राज्यांच्या सीमा ओलांडून हे गिधाड राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात पोहोचले आहे. याबाबतची माहिती वन्यजीव तज्ज्ञांनी बुधवारी दिली.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे (बीएनएचएस) संचालक किशोर रिठे यांनी सांगितले की, या गिधाडाने नैसर्गिक अधिवासात कोणत्याही अतिरिक्त अन्नाशिवाय स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. गिधाड संवर्धन कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, यामुळे भारतातील गिधाडांची संख्या वाढवण्याच्या मोहिमेला बळ मिळणार आहे. या प्रवासादरम्यान या गिधाडाने मध्य प्रदेशातील पाचमढीजवळील सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि कुनो राष्ट्रीय उद्यानालाही भेट दिली. त्यानंतर मंगळवारी ते रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात पोहोचले.
या मादी गिधाडाचे नाव 'X67' आहे, ती पाच वर्षांची आहे. दोन जानेवारी रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट वन्यजीव विभागाच्या सोमठाणा वनपरिक्षेत्रातून १५ गिधाडांना मुक्त करण्यात आले होते. या सर्व गिधाडांना सौर ऊर्जेवर चालणारे ट्रॅकिंग टॅग लावण्यात आले होते. गिधाडांच्या पायात निळ्या रंगाच्या कड्या आणि ओळख क्रमांक लावण्यात आले आहेत. हे गिधाड भारतातील असल्याचे निळा रंग दर्शवतो, तर 'एम' हे अक्षर महाराष्ट्र राज्याचे प्रतीक आहे. या टॅगच्या मदतीने शास्त्रज्ञांना गिधाडांच्या हालचाली, प्रवासाचे अंतर आणि त्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणे सोपे जाते.
मुक्त केल्यानंतर सुमारे चार महिने हे गिधाड मेळघाट परिसरातच वावरत होते. त्याने २८ मे रोजी मेळघाटातून आपला प्रवास सुरू केला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान असा प्रवास करत २७ दिवसांत ३,३३४ किलोमीटर अंतर कापून ते रणथंबोरमध्ये पोहोचले.