महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त लोणीकंद परिसरात वाहतूक मार्गांत बदल
Mar 18 2026
47
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त लोणीकंद परिसरात वाहतूक मार्गांत बदल
पिंपरी, ता. १८ - प्रतिष्ठेची ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा १८ ते २२ मार्च २०२६ दरम्यान पुण्यातील वाघोली येथील 'स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी'मध्ये पार पडत आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमुळे वाघोली-लोणीकंद परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक मार्गांत बदल केला आहे. त्यानुसार पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर १८ ते २२ मार्च या कालावधीत दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत. अवजड वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
स्पर्धेसाठी राज्यभरातून कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने येणार असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मालवाहतूक ट्रक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस, जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टरसारखी अशा अवजड वाहनांना लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गासह उपरस्त्यांवरही वाहतूकीस बंदी आहे. रस्त्याच्या कडेला अशा वाहनांचे पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.