महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यश मिळवून पैलवानांनी आपल्या महाराष्ट्राचे नाव जगामध्ये उज्वल करावे - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यश मिळवून पैलवानांनी आपल्या महाराष्ट्राचे नाव जगामध्ये उज्वल करावे - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, ता. २० - '' कुस्तीची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या महाराष्ट्रात अनेक दिग्गज मल्ल या कुस्तीतून घडले आहेत. महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेले खेळाडू जागतिक पातळीवर झळकावेत हीच आदरणीय अजितदादांची कायम भूमिका राहिलेली आहे. कुस्ती या खेळाची प्रतिष्ठा आपण जपूया आणि या खेळाला असेच पुढे नेऊया. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यश मिळवून पैलवानांनी आपल्या महाराष्ट्राचे नाव जगामध्ये उज्वल करा.'' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
वाघोली येथे स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीमध्ये ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (ता. १८) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास व परिवहन राज्यमंत्री माधुरी सतिश मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ''महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेले खेळाडू जागतिक पातळीवर झळकावेत हीच आदरणीय दादांची कायम भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळेच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा प्राप्त झाली. आदरणीय दादांच्या क्रीडा प्रेमाचा आणि तळमळीचा वारसा आपण सगळ्यांनीच पुढे नेऊयात. वाघोलीच्या स्पर्धेचे आयोजन खरंतर अत्यंत दिमागदार पद्धतीने करण्यात आलं त्यासाठी या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा मी विशेष अभिनंदन करते. ''
''खेळाडूंनी आखाड्यामध्ये प्रामाणिकपणा दाखवा. आपला खेळ अतिशय चांगल्या प्रकारे सादर करा, आपल्या महाराष्ट्रचे नाव जगामध्ये उज्वल करा. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांचं मी मनापासून अभिनंदन करते.'' असे सांगून पवार यांनी सर्व पैलवानांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आयोजक रामकृष्ण सातव पाटील म्हणाले, ''नेहमी कुस्ती स्पर्धेला भगिनींची संख्या कमी असते मात्र या वर्षी महिलांची संख्या खूप वाढली आहे. कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला पाहिजे ही संकल्पना होती त्यातूनच आज 4000 हजार महिलांचा सहभाग आहे. प्रथमताच कुस्ती स्पर्धेत महिलांचा गौरव होत आहे. ''
यंदाच्या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्र केसरी विजेत्याला फॉर्च्युनर गाडी, उपविजेत्याला स्कॉर्पिओ एन, तसेच विविध गटांतील सुवर्णपदक विजेत्यांना १८ बुलेट आणि रौप्य पदक विजेत्यांना स्प्लेंडर गाड्या बक्षीस देण्यात येणार आहेत. या बक्षिसांसाठी वाघोली ग्रामस्थ व हवेली तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी योगदान दिले आहे. स्पर्धेदरम्यान तरुणांसाठी फोटोग्राफी, रॅप यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे, असे संयोजकांनी सांगितले.