साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर निवडलेले उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधी संधीचं सोनं करतील - डॉ. श्रीपाल सबनीस
Mar 30 2026
55
साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर निवडलेले उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधी संधीचं सोनं करतील - डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी, ता. ३० - ''महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 120 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले प्रभाकर ओव्हाळ हे मिळालेल्या संधीचे सोनं करतील.'', असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ व ज्येष्ठ कवी राजन लाखे यांचा नागरी सत्कार शुक्रवारी (ता. २७) महापौर रवी लांडगे व डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला.
सोहम सार्वजनिक ग्रंथालय, अंशुल प्रकाशन व जगद्गुरु प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम संत तुकारामनगर येथे पार पडला. यावेळी, गझलकार व साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, संयोजक जगन्नाथ नेरकर, ॲड. लक्ष्मण रानवडे, पत्रकार व लेखक विजय जगताप उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, "आपल्या लेखणीतून उपेक्षित समाजातील वेदनांना न्याय मिळवून देण्याचे काम प्रभाकर ओव्हाळ यांनी आयुष्यभर केले आहे, ते समरसतेची गुढी उभारतील." ''महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित दोन्ही सदस्य शहराचे भूषण व अभिमान आहेत. महापालिका साहित्य परिषदेच्या उपक्रमांच्या पाठीशी सदैव उभी असेल.'' असे म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ नेरकर यांनी केले. गिरीश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू मांजरे यांनी आभार मानले.