पिंपरी-चिंचवडमध्ये होणार पाच नवीन पोलिस ठाणी, राज्य शासनाकडे पाठवला प्रस्ताव
पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी आणि देहूगावमध्ये होणार नवीन पोलिस ठाणी
पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी आणि देहूगाव येथे पाच नवीन पोलिस ठाणी होणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सध्या २३ पोलिस ठाणी आहेत. नवीन ५ पोलिस ठाणी निर्माण झाल्यास शहातील पोलिस ठाण्यांची संख्या २८ होणार आहे. बावधन, हिंजवडी, सांगवी, एमआयडीसी भोसरी, दिघी, चिखली आणि देहूरोड या पोलिस ठाण्यांचे विभाजन करुन ही पोलिस ठाणी निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. परिमंडळ चारसाठी नवीन पोलिस उपायुक्त व इतर पद निर्मितीबाबतचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठवला आहे.
नवीन पोलिस ठाण्यांमधील प्रस्तावित पदांची संख्या पिरंगुटसाठी- १९०, जांबेसाठी - १८९, पिंपळे सौदागरसाठी - १८३, मोशीसाठी - १९४, देहूगावसाठी - १९४ अशी आहे. परिमंडळ - ४ साठी ११ पदे भरावयाची आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, ''नागरिकांना तत्काळ पोलिस मदत व सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी नवीन पाच पोलिस ठाणी निर्माण केली जाणार आहेत.''