नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उन्हाळी वेळापत्रक जाहीर, देशांतर्गत पर्यटनाचा आनंद घेता येणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उन्हाळी वेळापत्रक जाहीर, देशांतर्गत पर्यटनाचा आनंद घेता येणार
पुणे, ता. २७ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपले पहिले उन्हाळी वेळापत्रक २९ मार्च ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, आता या विमानतळावरुन देशभरातील ४६ शहरांमध्ये प्रवास करता येणार आहे तसेच ३० नवीन देशांतर्गत मार्गांचा समावेश या वेळापत्रकात करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना विमान प्रवासाने देशांतर्गंत पर्यटनाचा आनंद घेता येईल.
प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, दिल्लीमधून सर्वाधिक म्हणजे ९ विमाने प्रवासासाठी उपलब्ध केली जातील. गोव्यातून - ७, बेंगळुरुमधून - ६ आणि कोचीनमधून -५ विमान प्रवासी सेवेसाठी देण्यात येतील. हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदौर ही शहरेही विमानसेवा असेल. एअर इंडिया, इंडिगो व अकासा या सेवाही नवीन वेळापत्रकानुसार सेवेत वाढ करतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांची संख्या वाढवण्याचे नियोजन आहे. दररोज १५६ असे दर आठवड्याला अंदाजे १,०९२ उड्डाणे करण्याचे प्रस्तावित आहे.
वेळापत्रकातील ३० नवीन मार्गामध्ये आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, दीव, गोवा, गोरखपूर, हिंडन, जबलपूर, राजकोट, जम्मू, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पाटणा, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, त्रिवेंद्रम आणि विझाग या शहरांचा समावेश आहे.