अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज; आपत्कालीन पथके तैनात

अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज; आपत्कालीन पथके तैनात

पिंपरी | २४ सप्टेंबर २०२६ : अनंत चतुर्दशीनिमित्त उद्या होणाऱ्या गणेशमूर्तींच्या अंतिम विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रशिक्षित अग्निशमन जवान, आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्रे आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे.


महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित स्टाफ नर्स, वॉर्डबॉय आणि रुग्णवाहिका चालकांची पथके सज्ज आहेत. अग्निशमन विभागाने विशेष वाहनेही तयार ठेवली आहेत.

महापालिकेच्या उपलब्ध नोंदीनुसार ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १०, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ११ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्पाईन रोड यमुनानगर, मोहननगर सांस्कृतिक भवन, सेक्टर २६ मधील गणेश तलावाजवळ आणि सेक्टर २७ मधील नियोजित महापौर निवास मैदानासह विविध ठिकाणी विसर्जन व मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 


दरम्यान, १४ ते २३ सप्टेंबरदरम्यान ४९ हजार ८०३ गणेशमूर्तींचे संकलन किंवा विसर्जन झाले आहे. यामध्ये १० हजार १७० पर्यावरणपूरक आणि ३९ हजार ६३३ पीओपी मूर्तींचा समावेश आहे. तसेच २३ सप्टेंबरपर्यंत २२ हजार ६४७.२५ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. 

नागरिकांनी फुले, हार, दुर्वा आणि अन्य पूजासाहित्य जलस्रोतांमध्ये न टाकता निर्माल्य संकलन व्यवस्थेचा वापर करावा, तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेच्या कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories