news
clock

‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी’ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा - महापौर रवी लांडगे

पिंपरीमधील प्रकल्प स्थळी भेट देऊन महापौरांनी घेतला सविस्तर आढावा

पिंपरी, ता. १७ - ''पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येत असलेल्या ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. यासाठी महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, उद्यान आदी संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे.'', असे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी दिले.

पिंपरी येथे उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचा महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष स्थळावर भेट देत सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव, शंकर लोंढे, प्रल्हाद कांबळे, आनंदा कुदळे, ॲड. विद्या शिंदे, कविता खराडे यांच्यासह महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती महापौरांना दिली.

महापौरांनी प्रकल्पाची उभारणी, अत्याधुनिक एलईडी स्क्रीन, प्रकाश व्यवस्था, आकर्षक बाग (गार्डन) तसेच नक्षीकाम यांसारख्या विविध घटकांची माहिती संबंधित विभागांकडून घेतली. प्रत्येक कामाची गुणवत्ता उच्च राखण्याच्या सूचना देत प्रकल्पाचे सौंदर्य आणि उपयुक्तता अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला.

महापौर लांडगे म्हणाले, ''महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाज प्रबोधनासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सृष्टी एक प्रेरणादायी केंद्र ठरेल. त्यामुळे या ठिकाणाची उभारणी करताना दर्जा आणि वेळ यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या या महापुरुषांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या सृष्टीचे काम नियोजित वेळेत व उच्च दर्जाने पूर्ण करण्यात यावे.''

या सृष्टीमध्ये नागरिकांसाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी माहितीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण आणि जनजागृतीची संधी उपलब्ध होणार आहे. एलईडी स्क्रीनद्वारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा तसेच विविध सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय आकर्षक बाग, प्रकाशयोजना आणि कलात्मक नक्षीकामामुळे हा परिसर नागरिकांसाठी एक सुंदर पर्यटनस्थळ ठरणार आहे, असे महापौरांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories