पिंपरी | १६ सप्टेंबर २०२६ : कला, साहित्य, संगीत, संस्कृती आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन १८ ते २० सप्टेंबरदरम्यान करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महोत्सवाची रूपरेषा, सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांचा सहभाग आणि पुरस्कार सोहळ्याबाबत माहिती देण्यात आली.
शहरातील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा देणे तसेच कला, साहित्य, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा गौरव करणे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या त्रिदिवसीय महोत्सवात विविध कलाविष्कार, नामवंत कलाकारांचे कार्यक्रम, साहित्यिक उपक्रम, संगीत, लोककला आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
महापौर रवि लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडची ओळख केवळ औद्योगिक नगरीपुरती मर्यादित नसून कला, साहित्य, संगीत आणि संस्कृतीची परंपरा जपणारे शहर म्हणूनही विकसित होत असल्याचे सांगितले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्य संयोजक तथा आमदार अमित गोरखे यांनी शहरातील कला, साहित्य, संगीत, नाट्य आणि लोककलेतील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकता असल्याचे सांगितले. नवोदित कलाकारांना संधी देणे आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव करणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य संयोजक तथा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी विविध सांस्कृतिक प्रवाह आणि कलागुणांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या महोत्सवातून होत असल्याचे सांगितले. नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
पत्रकार परिषदेस आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे आणि नगरसदस्य राहुल कलाटे उपस्थित होते.