वाहनचोरी करणारे दोन सराईत चोर अटकेत, ३६ लाखांच्या मोटारसायकल जप्त, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत चोर अटकेत, ३६ लाखांच्या मोटारसायकल जप्त, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
पिंपरी, ता. ८ - वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक तपास करुन अटक केली आहे. आरोपींकडून ३६,००,०००/- रुपये किंमतीच्या मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी महाळुंगे येथील पानसे अॅटो प्रा. लि. कंपनीसमोरील पार्किंगमध्ये स्प्लेंडर मोटर सायकल हॅन्डललॉक करुन लावली असता अज्ञात चोरटयाने ती चोरुन नेली होती. याबाबत, संदीपकुमार किशोरी सरन निसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास करताना दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाने महाळुंगेपासून जुन्नरपर्यंत असे ८० किलोमीटरपर्यंत बारकाईने सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन तसेच तांत्रिक तपास केला. या तपासात जुन्नर येथील तरुणांनी चोरल्याचे निष्पन्न झाले, तपासपथकाने त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. यश सुनिल हांडे (वय १९ वर्षे, रा. पिंपळगाव सौदा ता. जुन्नर) व किरण संभाजी जाधव (वय २६ वर्षे, रा. टिकेकरवाडी, ता. जुन्नर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडे तपास केला आला असता त्यांनी पुणे, नवी मुंबई, बृहमुंबई, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर परिसरातुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून ३६ लाख रुपये किंमतीच्या २४ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त महाळुंगे एमआयडीसी विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अनिल देवडे, सहा पोलीस निरीक्षक, भास्कर पुल्ली पोलीस अंमलदार, चेतन सावंत, युवराज बिराजदार, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, राजकुमार हनमंते, प्रशांत कसबे, महेश गायकवाड, शिवाजी मरकड, आकाश घाडगे यांनी केली आहे. पुढील तपास हवालदार चेतन सावंत करत आहेत.