पुणे-पिंपरी-चिंचवडधील आरएमसी प्रकल्पासांठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाणार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
पुणे-पिंपरी-चिंचवडधील आरएमसी प्रकल्पासांठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाणार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
पुणे, ता. ८ - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरएमसी प्लान्ट उद्योगांसाठी येत्या तीन आठवड्यांत मार्गदर्शक तत्त्वे (Standard operating procedure) तयार केली जाणार आहेत. पुढील चार ते सहा महिन्यांत पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी प्रदूषणमुक्त 'कोअर झोन' निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
शहरात 'आरएमसी प्लॅन्ट्स'मुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत आहे. त्यामुळे नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यात पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका डॉ. आयुक्त विजय सूर्यवंशी, दोन्ही शहरांतील वरिष्ठ पोलिस अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच पुणे जिल्हा रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लॅन्ट असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, "वाढते वायुप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने मार्गदर्शनक तत्त्वे तयार करण्याचे ठरविले आहे. तोपर्यंत अधिकृत आणि नियमांचे पालन करणारे आरएमसी प्रकल्प अटी व शर्तीसह सुरु राहतील. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 'रेड झोन' क्षेत्र वगळता बुधवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी आरएमसी वाहतुकीला पूर्ण परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच आरएमसी वाहतुकीस परवानगी असेल. ही तात्पुरती व्यवस्था मार्गदर्शक तत्वे अंतिम होईपर्यंत लागू राहणार आहे. नंतर, मात्र अनधिकृत प्लॅन्ट्सवर कठोर कारवाई करुन ते बंद करण्यात येतील. 'आरएमसी' वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्पष्ट नेमप्लेट लावणे, वाहनांमध्ये कॅमेरे बसविणे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. पुणे महानगर क्षेत्रातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरएमसी उद्योगासाठी स्वतंत्र नियमन प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे."