'पीएमपीएमएल'च्या दापोडी ते मार्केट यार्ड बससेवेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन
'पीएमपीएमएल'च्या दापोडी ते मार्केट यार्ड बससेवेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी, ता. २७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी येथील क्र. ११ मंत्री निकेतन बस स्टॉप येथून मार्केट यार्डपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या पीएमपीएमएल बससेवेचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
दापोडी परिसरातील नागरीकांना पुणे शहराच्या मुख्य भागांशी जोडणारी सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. या नव्या मार्गामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठी मदत होणार असून वेळ आणि खर्चाचीही बचत होणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, नगरसदस्या स्वाती काटे, प्रतिक्षा लांघी-जवळकर, नगर सदस्य राजू बनसोडे, अप्पर डेपो मॅनेजर सुनिल दिवाणजी, ट्राफिक मॅनेजर यशवंत हिंगे, समन्वयक गणेश कवठेकर, बसचे चालक मनीष चितल्लू आणि वाहक योगेश जगताप यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना परवडणारी व सुलभ प्रवास सेवा उपलब्ध करून देणे, या दृष्टीने अशा बसमार्गांची सुरुवात अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले. या मार्गावर बससेवा सुरु झाल्याने विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी विशेष समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले. परिसरातील नागरिकांकडून या बससेवेची मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत होती. अखेर ही सेवा सुरु झाल्याने स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकाभिमुख सुविधांना प्राधान्य.....
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. दापोडी ते मार्केट यार्ड या नव्या बसमार्गामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यातही अशा नागरिकाभिमुख सुविधांना प्राधान्य दिले जाईल.
- रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका