तडीपार आदेशाचा भंग करुन धारदार कोयता बाळगणारा युवक अटकेत
पिंपरी, ता. १५ - तडीपार आदेशाचा भंग करुन धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या २१ वर्षीय युवकाला पोलिसांनी संत तुकारामनगर परिसरातून अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १४) करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर येथील एच. ए. मैदान परिसरात आरोपी पवन सचिन ससाणे (वय २१, रा. गांधीनगर, पिंपरी) याच्याकडे अंदाजे ₹४०० किमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला. आरोपीवर यापूर्वी ऑक्टोबर २०२५ च्या तडीपार आदेशानुसार दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्याने या आदेशाचा भंग करुन आयुक्तालय हद्दीत प्रवेश केला. तसेच घातक शस्त्र बाळगून तो संभाव्य गुन्हा करण्याच्या उद्देशाने परिसरात वावरत होता. याबाबात, पोलीस हवालदार जावेद शहाबुद्दीन मुजावर यांनी फिर्याद नोंदवली.
आरोपीविरुद्ध संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७ (१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.