हिंजवडी येथे शेअर मार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने महिलेची २ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. १५ - शेअर बाजारात जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे ₹२ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना आरोपीने स्वतःला मेसर्स आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून संपर्क साधला. आरोपी ओमकार भिलारे (मो. ९३२२०५२७२७) यांनी फोन व संदेशाद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादीचे डिमॅट खाते उघडून सुरुवातीला गुंतवणूक करून ती रक्कम शेअर बाजारात गुंतविल्याचे भासवण्यात आले. पुढे अधिक नफ्याचे आमिष दाखवत २ लाख दुसऱ्या खात्यात पाठविण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर ना नफा मिळाला ना मूळ रक्कम परत करण्यात आली, असे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकारे फिर्यादीची एकूण २ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.