news
clock

पुणे पोलिसांच्या 'पुणे ट्रॅफिक अॅप'ला प्रतिष्ठेचे 'स्कॉच अवॉर्ड' जाहीर

पुणे, ता. १३ - वाहतूक पोलिसांनी विकसित केलेल्या पुणे ट्रॅफिक अॅपला '१०७ वे - स्कॉच अवॉर्ड' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारच्या सुशासन आणि डिजिटल इनोव्हेशन क्षेत्रात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जातो. येत्या २८ मार्च रोजी नवी दिल्ली येथील 'इंडिया हॅबिटेट सेंटर'मध्ये एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

'पुणे ट्रॅफिक अॅप' हे १४ जून २०२५ रोजी वापरात आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी हे अॅप विकसित केले आहे. त्यासाठी ओमिनी ब्रीज टेक्नॉलॉजी आणि क्रिश इंट्राट्रेड या कंपन्यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. 

गेल्या आठ महिन्यांत एक लाख ४० हजारांहून अधिक नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. नागरिकांनी दोन लाखांपेक्षा जास्त वाहतूक नियमभंगाची माहिती छायाचित्रांसह वाहतूक पोलिसांना पाठवली. या तक्रारींच्या आधारे बेशिस्त वाहनचालकांवर १२ कोटी रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला आहे. नियमांच्या उल्लंघनाबरोबरच रस्ते अपघात, वाहनातील बिघाड, खड्डे, तेल गळती, पाणी साचणे आणि झाडे पडणे अशा पाच हजार चारशेहून अधिक समस्यांची माहिती नागरिकांनी कळवली आहे. यापैकी ८० टक्के समस्यांवर पुणे महापालिकेकडून तत्काळ कार्यवाही करण्यात आली आहे.

प्रकल्पाचे सादरीकरण, तज्ज्ञ समितीद्वारे मूल्यांकन आणि देशभरातील नागरिकांचे ऑनलाइन मतदान हे टप्पे पार केल्यानंतर पुणे ट्रॅफिक अॅपला स्कॉच अॅवॉर्ड जाहीर झाले आहे. नाविन्यपूर्णता, पारदर्शकता आणि समाजावर झालेला सकारात्मक परिणाम यासाठी हे अॅप्लिकेशन प्रभावी आहे.


लोकसहभागातून वाहतूक शिस्तबद्ध करण्याचा संकल्प


"या पुरस्कारामुळे पुणे पोलिसांच्या तंत्रज्ञानाधारित उपक्रमांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. भविष्यातही नागरिकांच्या सहभागातून शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्याचा आमचा संकल्प आहे." - मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे शहर

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories