सुसमध्ये दोन गटांत हाणामारी; एकूण १३ जणांविरोधात गुन्हे दाखल!

सुसमध्ये दोन गटांत हाणामारी; एकूण १३ जणांविरोधात गुन्हे दाखल!

सुस | २४ सप्टेंबर २०२६ : पूर्वीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुस येथील महादेवनगर, बांदलवस्ती परिसरात दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात फिर्याद दिली असून, बावधन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गुन्ह्यात आठ तर दुसऱ्या गुन्ह्यात पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात दिलीप सुरेश बांदल (वय ४२,  रा. बांदल फार्म, बांदलवस्ती, महादेवनगर, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी आदेश टेमकर, दत्ता ऊर्फ संजय घाडगे, सोन्या ऊर्फ राहुल ढगे, दर्शन कसबे, शिवतेज पवार, स्वराज मरकुटे, सचिन बैराट आणि विकास ससार यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

दिलीप बांदल यांच्या फिर्यादीनुसार, जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवतेज पवार याने डोक्यात दांडका मारून जखमी केले, तर आदेश टेमकर यानेही डोक्यावर आणि तोंडावर दांडक्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याच घटनेप्रकरणी दुसऱ्या बाजूने दर्शन अविनाश कसबे (वय १९, रा. नांदे-दख्खन हॉटेलच्या शेजारी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दिलीप बांदल, विकास ऊर्फ सोन्या बांदल, राजवर्धन बांदल, गोवर्धन बांदल आणि प्रज्वल बांदल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर्शन कसबे यांच्या फिर्यादीनुसार, ते आदेश टेमकर, सोन्या ऊर्फ राहुल ढगे, शिवतेज पवार, दत्ता ऊर्फ संजय घाडगे, स्वराज मरकुटे, सचिन बैराट आणि विकास ससार यांच्यासोबत प्रज्वल बांदल यांच्या घराशेजारी मोकळ्या जागेत गप्पा मारत होते. त्यावेळी संबंधित पाच जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दिलीप बांदल यांनी शिवतेज पवार यांच्या डोक्यात दांडका मारल्याचे, तर इतरांनी आदेश टेमकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर मारहाण केल्याचे आरोप केले असून, या आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. बावधन पोलीस ठाण्यात दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक ठाकूर पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories