पावसामुळे शहरात झाड पडल्याच्या १७ घटना, 'डीपी'ला आग व सीमाभिंत पडल्याचीही घटना
पिंपरी, ता. ३ - पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी (ता. ४) झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी सव्वा दोन ते सायंकाळी ७.२५ या कालावधीत झाड पडण्याच्या १७ घटनांची व इतर दोन घटनांची नोंद झाली.
इतर दोन घटनांमध्ये एका इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना व रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची १ घटना नोंद झाली आहे. झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी तसेच कोणी जखमी झाल्याची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे, असे अग्निशमन विभागाने सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. आपत्कालीन घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली.