दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
पुणे, ता. १३ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरु होणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या 'www.mahahsscboard.in' या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळानी दहावी-बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान होणार आहे.
बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ ( National Skills Qualifications Framework) अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान होईल. यात माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचाही समावेश आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, सोशल मीडिया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला मंडळ जबाबदार राहणार नाही, असे आवाहन डॉ. माळी यांनी केले आहे.