news
clock
१५ मे नंतर घरगणना सुरु, नागरीकांनी प्रगणकांना अचूक माहिती द्यावी - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

१५ मे नंतर घरगणना सुरु, नागरीकांनी प्रगणकांना अचूक माहिती द्यावी - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

१५ मे नंतर घरगणना सुरु, नागरीकांनी प्रगणकांना अचूक माहिती द्यावी - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 

पिंपरी, ता. १३ - जनगणनेतील पहिला स्वगणनेचा टप्पा सुरु आहे. पुणे जिल्ह्यात स्वगणनेचा कालावधी शुक्रवारपर्यंत (ता. १५) आहे.  १५ मे नंतर जिल्ह्यात घरगणनेला सुरुवात होणार आहे. घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३४ पैकी ३० प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक आहे. माहिती न देणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जनगणनेस मदत न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे घराची तसेच घरातील सदस्यांची माहिती अचूक माहिती द्या, माहिती लपवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जनगणना कायद्यांतर्गत जनगणना प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे किंवा खोटी माहिती देणे हा गुन्हा आहे. त्यानुसार दोषी व्यक्तीला एक हजारापर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये तीन वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. प्रगणकांना आधार कार्ड, पॅन नंबर किंवा बॅंक डिटेल्स देण्याची आवश्यकता नाही. ही माहिती कोणी मागत असल्यास त्याबाबत तत्काळ प्रशासनाला कळवावे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.  

स्वगणना एचएलओ अॅपवर करावयाची आहे.  जनगणेची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरुपात होत आहे. नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय राहाणार आहे. डेटा कुठेही शेअर केला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सर्व माहिती अचूक भरावी. तसेच जनगणनेसाठी येणाऱ्या कमर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. घरयादी व घरगणना ही केवळ एक शासकीय प्रक्रिया नाही, तर आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठीची भक्कम पायाभरणी आहे. प्रत्येक नागरिकाने दिलेली अचूक माहिती हीच शहराच्या नियोजनाची ताकद ठरते.

पिंपरी चिंचवड शहरात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरयादी व घरगणना प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या काळात प्रगणक आपल्या घरी भेट देणार असून, त्यांना योग्य व अचूक माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

आपले सहकार्य शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

चला, प्रगणकांना सहकार्य करून जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूयात, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories