महाळुंगेत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी

महाळुंगेत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी

महाळुंगे | १३ नोव्हेंबर २०२६ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात महाळुंगे गावाजवळील इंडोरन्स चौक परिसरात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा २९ वर्षीय मित्र गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमींना मदत न करता आणि पोलिसांना माहिती न देता अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महाळुंगे गावचे हद्दीत इंडोरन्स चौकाकडून महाळुंगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, इंडोरन्स चौकाजवळ घडली.

या प्रकरणी दत्तात्रय वाल्मिक आल्टे (वय ३६ वर्षे, पिरंगुट घोटावडे फाटा, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, मूळ गाव वडगाव सिद्धेश्वर, तालुका व जिल्हा उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ शंकर वाल्मिक आल्टे (वय ३३ वर्षे) आणि त्याचा मित्र अमोल दिलीप वाळवंटे (वय २९ वर्षे) हे दोघे हिरो होंडा मोटारसायकल क्रमांक एमएच १२ एसपी १६१३ वरून प्रवास करीत होते.

महाळुंगे गावाजवळील इंडोरन्स चौक परिसरात आले असता अज्ञात वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या अपघातात शंकर वाल्मिक आल्टे आणि अमोल दिलीप वाळवंटे हे दोघेही गंभीर जखमी झाले. तसेच मोटारसायकलीचेही नुकसान झाले. या अपघातात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे शंकर वाल्मिक आल्टे यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली नाही. तसेच जखमींना उपचारासाठी मदत न करता तो वाहनासह घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी दत्तात्रय आल्टे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १८४, १३४(अ)(ब)/१७७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार गाडीलकर करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories