नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त महा जन-आरोग्य शिबिर; 823 हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
पिंपरी-चिंचवड | 11 सप्टेंबर 2026 : नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर, चिंचवड येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात महा जन-आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 823 हून अधिक नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवांचा मोफत लाभ घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आमदार अमित गोरखे यूथ फाऊंडेशन, संविधान संस्कार परिषद आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार उमा खापरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिरात नागरिकांसाठी विविध वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. जनरल चेकअपअंतर्गत ताप, रक्तदाब, मधुमेह, व्हायरल इन्फेक्शन तसेच अन्य सामान्य आजारांची तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, अस्थिरोग तसेच कान, नाक व घशाशी संबंधित आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. महिलांसाठी स्त्रीरोग तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन, बालकांसाठी बालरोग तपासणी आणि त्वचारोगाशी संबंधित समस्यांसाठी तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरज असलेल्या नागरिकांसाठी ईसीजी तपासणीची सुविधाही मोफत देण्यात आली.
शिबिराच्या ठिकाणी आयुष्मान भारत कार्ड नोंदणी केंद्राची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पात्र नागरिकांची नोंदणी करून त्यांना आयुष्मान भारत कार्ड काढून देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
अनुराधाताई गोरखे यांनी वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या शुभेच्छांना समाजसेवेची जोड देण्याच्या उद्देशातून शिबिर आयोजित केल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज आणि मोफत उपलब्ध व्हावी, आजाराचे वेळेत निदान व्हावे तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, शिक्षण आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर मंगला कदम, संजय पाटील, मंदार देशपांडे, सुप्रिया चांदगुडे, शैलीजा मोरे, मधुरा शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते.