पिंपरी-चिंचवड | 11 सप्टेंबर 2026 : भोसरी औद्योगिक परिसरातील एका खासगी कंपनीच्या प्रतिनिधीकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागून त्यापैकी 25 लाख रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून चार जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 613/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील सहा महिन्यांपासून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीच्या संपर्कात होते. माहिती अधिकाराच्या माध्यमातून कंपनीची कागदपत्रे काढल्याचे सांगत महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास 5 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास कंपनीचे नुकसान करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाईचे नियोजन केले. राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय 38), अल्ताफ उस्मान जानवेकर (वय 53), रमेश भिमा मांजरेकर (वय 39) आणि सुनील राजेंद्र कानू (वय 35) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 308(3), 308(4), 308(5) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील कानू याच्या ताब्यातील मारुती सुझुकी XL-6 वाहनातून आरोपी संबंधित ठिकाणी आले होते. खंडणीच्या रकमेबाबत चर्चा झाल्यानंतर राहुल मिश्रा याने फिर्यादीकडून 25 लाख रुपयांची रोख रक्कम काळ्या रंगाच्या बॅगसह स्वीकारली. याचवेळी खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, खंडणी मागण्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे तसेच आरोपींना अन्य व्यक्तींनी मदत केली आहे का, या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्रात दबाव किंवा धमकी देऊन खंडणी वसूल करण्याच्या प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.