५७ हजार विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहार व्यवस्था होणार अधिक सक्षम; अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन

५७ हजार विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहार व्यवस्था होणार अधिक सक्षम; अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन

पिंपरी | ११ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. या अद्ययावत सुविधेमुळे शहरातील सुमारे ३०० शाळांमधील ५७ हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे सांगण्यात आले.

अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमितपणे शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि पोषणमूल्ये लक्षात घेऊन केंद्रीय स्वयंपाकगृह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अद्ययावत करण्यात आले आहे. आहार तयार करण्यापासून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या निकषांवर भर देण्यात येणार आहे.


यावेळी महापौर रवि लांडगे यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यांचा जवळचा संबंध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत स्वच्छ, सकस आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. सुमारे ५७ हजार विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देताना स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवत्तेचा उच्च दर्जा कायम राखण्यासाठी अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृह महत्त्वपूर्ण ठरेल, असे लांडगे म्हणाले.

या केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आमदार श्रीकांत भारतीय यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे देण्यात आलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशनच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे काम पुढेही राबविण्यात येणार आहे.


या उद्घाटन समारंभास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, इस्कॉनचे आध्यात्मिक गुरु गौरांग प्रभू, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका सारिका मासुळकर यांच्यासह अन्नामृत फाउंडेशनचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

अद्ययावत स्वयंपाकगृहामुळे मोठ्या प्रमाणावर पोषण आहार तयार करणे, स्वच्छता व अन्नसुरक्षेचे व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत आहार पोहोचविण्याची प्रक्रिया अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories