बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेचा प्रस्ताव राज्य सरकाराने फेटाळला
पुणे, ता. १८ - राज्यात नामांकित असलेल्या पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेचा १६ वर्षांपूर्वी पाठवलेला प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळला आहे. सुरुवातीला स्वायत्ततेसाठी विचाराधीन असलेल्या यादीतून बी. जे. मेडिकल कॉलेजचे वगळले आहे. यादीत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश केला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाने वैद्यकीय क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाचे निर्णय स्थानिक स्तरावर घेता यावे, यासाठी महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी महाविद्यालय व रुग्णालयाला स्वायत्त करावे, असा पहिला प्रस्ताव २०११ मध्ये आणि दुसरा २०१७ ला वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवला होता. तो शासनाच्या विचाराधीन होता. मात्र, विभागाने अचानकच बी. जे. मेडिकल कॉलेजचे नाव यादीतून वगळले आहे.
राज्य सरकारने मुंबईतील जे. जे. रुग्णालय आणि नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तीन महिन्यांत याबाबत निर्णय देणार आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजचे नाव वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 'बीजे'ला स्वायत्तता मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर बी. जे. मेडिकल कॉलेजला यादीतून वगळण्यात आल्याची चर्चा आहे.
निर्णय घेण्यात येईल..........
पुण्याने प्रस्ताव कधी पाठवला आणि त्याचे पुढे काय झाले, याबाबत माहिती घेण्यात येईल. त्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- माधुरी मिसाळ, राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग