news
clock
स्वायत्ततेचा दर्जा देण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश

स्वायत्ततेचा दर्जा देण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश

स्वायत्ततेचा दर्जा देण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश 

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

पुणे, ता. २५ -  राज्यातील  प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याच्या यादीतून पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव वगळण्यात आले होते. त्याबद्दल, वैद्यकीय क्षेत्रातून नाराजी व्यक्त झाली होती. त्यानंतर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आता स्वायत्ततेसाठीच्या उच्चस्तरीय समितीत करण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली.

त्यामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळणार का याकडे पुन्हा वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मुंबई, पुणे आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय संस्थांना स्वायत्ततेचा दर्जा देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत मुंबईतील सर जे. जे. समूह रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय या तीन प्रमुख संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. 

राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, एकूण सात सदस्यांचा या समितीत समावेश आहे. समिती वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची प्रशासकीय व शैक्षणिक रचना, स्वायत्ततेची गरज, संभाव्य लाभ तसेच देश-विदेशातील यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास करणार आहे. 

स्वायत्त संस्थांसाठी संचालक मंडळ व शैक्षणिक परिषदेची रचना, अधिष्ठाता व संचालकांचे अधिकार, आर्थिक व प्रशासकीय स्वातंत्र्य, तसेच कर्मचारी व अध्यापकांच्या सेवा अटी याबाबत समिती शिफारसी करणार आहे, संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. समितीला पुढील तीन महिन्यांत राज्य सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मिसाळ यांनी दिली. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories