चऱ्होलीमध्ये मटका जुगारावर कारवाई, १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा
चऱ्होलीमध्ये मटका जुगारावर कारवाई, १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा
पिंपरी, ता. २८ - दिघी परिसरात मटका जुगार चालवणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. २७) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आझाद चौक, चऱ्होली येथे शंभुराज वॉशिंग सेंटर शेजारी करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण सुमारे १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिस शिपाई शशिकांत देवराम नांगरे (वय ३४, गुन्हे शाखा युनिट ३, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्यात आकाश शंकर तापकीर (वय ३०, रा. चोवीसावाडी, चऱ्होली) हा मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे. सुमित उर्फ बाळु येवले (चऱ्होली) , अनिल तापकीर (चऱ्होली) आणि प्रतिक कदम (निरगुडी ता. हवेली) या तीन आरोपींचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश तापकीर हा इतर आरोपींच्या सांगण्यावरुन मोबाईलवर मटका जुगार चालवत होता. कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण सुमारे १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये अॅपल कंपनीचा आयफोन, रोख रक्कम आणि टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी यांचा समावेश आहे.