पिंपरी-चिंचवड | 15 सप्टेंबर 2026 : बालकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकारातून ‘चाईल्ड फ्रेंडली बस’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विशेष बाल पोलीस पथक आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या शुभांगी तांबट आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. कॅरोलिन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बालकांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशील आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. बालकांसाठी सुरक्षित, संवेदनशील आणि बालस्नेही शहर निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस आयुक्त चौबे यांच्या हस्ते ‘चाईल्ड फ्रेंडली बस’ला हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ही बस पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये फिरून बाल हक्क संरक्षण, सुरक्षित बालपण आणि बालकांशी संबंधित जनजागृती करणार आहे. ‘बालस्नेही शहर’ या अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
कार्यक्रमाला पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) धीरज पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड, विशेष बाल पोलीस पथकाचे अधिकारी व अंमलदार, विशेष बाल पोलीस अधिकारी तसेच होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.