जुन्या वादातून दोन मित्रांवर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, दापोडीतील घटना
पिंपरी, ता. २७ - दापोडी परिसरातील जयभीम नगर येथे जुन्या वादातून सहा जणांनी मिळून दोन मित्रांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. २५) घडली. या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महेश पवन गुळवे (वय २२ वर्षे, दापोडी) याने याबाबत फिर्याद दिली आहे. दापोडीतील रहिवासी असलेले सनि गजभिव (वय २८ वर्षे), नन्या उर्फ जयप्रकाश पंडीत (वय २२ वर्षे), संदेश गजभिव (वय २३ वर्षे), रोहन बनसोडे (वय २३ वर्षे), डेविड उर्फ मोन्या पाटोळे (वय २२ वर्षे) व प्रथमेश चलवारे (वय २४ वर्षे) हे या घटनेतील आरोपी आहेत. पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवारी (ता. २५) रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास जयभीम नगर परिसरातील डॉली क्रॉस चर्चजवळ हा हाणामारीचा प्रकार घडला. फिर्यादी महेश व त्याचा मित्र आकाश पिंजन यांच्यासोबत सुमारे चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपींनी लोखंडी रॉड, बांबू व बिअरच्या बाटल्या घेऊन दोघांना बेदम मारहाण केली.
आकाशला खाली पाडून त्याचा गळा दाबला. सर्वांनी मिळून तेथे पडलेला सिमेंटच्या गट्टूने, लाकडी बांबू लोखंडी रॉड, फुलांच्या कुंडया, बिअरच्या बाटल्यांनी फिर्यादी मेहश व आकाशला मारुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न कलेला आहे. त्याचप्रमाणे फिर्यादीला शिवीगाळ करण्यापूर्वी आरोपींनी फिर्यादीचे मित्र साहील लांडगे व रुपेश कांबळे यांना देखील मारहाण करुन गंभीर जखमी केले, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपींविरोधात दापोडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), १८९ (२), १९१(२), १९१(३), १९०, ३(५) मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ फौजदारी सुधारणा कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.