दिवाळीचे ८ हजार रुपये अनुदान देणारा मेसेज बनावट; पिंपरी-चिंचवड पोलिसांचा इशारा

दिवाळीचे ८ हजार रुपये अनुदान देणारा मेसेज बनावट; पिंपरी-चिंचवड पोलिसांचा इशारा

पिंपरी-चिंचवड | ४ नोव्हेंबर २०२६ : दिवाळीनिमित्त सर्व भारतीय नागरिकांना ८ हजार रुपये रोख अनुदान मिळणार असल्याचा संदेश सध्या व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून पसरवण्यात येणारा हा संदेश बनावट असल्याचा इशारा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिला आहे. नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त प्रत्येक भारतीय नागरिकासाठी ८ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केल्याचा दावा करण्यात येत आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी संदेशातील लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे.

मात्र, अशा लिंकवर क्लिक केल्यास नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि बँकिंग तपशील चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक होऊ शकते.

नागरिकांनी अनुदानाच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच व्हॉट्सॲप, गुगल, सोशल मीडिया किंवा इतर सर्च इंजिनवर दिसणाऱ्या अनोळखी वेबसाइट अथवा लिंकवर कोणतीही वैयक्तिक माहिती भरू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही वेबसाइटवर ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी त्या वेबसाइटचा पत्ता (URL), तिची सत्यता आणि संबंधित सेवा पुरवठादाराची अधिकृतता तपासावी.

तसेच अनोळखी लिंकवर आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक खात्याची माहिती देऊ नये. कोणालाही OTP, ATM PIN, CVV किंवा UPI PIN सांगू नये. अनुदान मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा पैसे भरू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अशा प्रकारचे बनावट संदेश इतरांना फॉरवर्ड करू नयेत. सरकारी योजनांची माहिती केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळांवरूनच तपासावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा

नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास त्यांनी विलंब न करता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवता येते.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अनुदानाच्या आमिषाने होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories