मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी संदीप वाघेरे न्यायालयात

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी संदीप वाघेरे न्यायालयात

पिंपरी-चिंचवड | ४ नोव्हेंबर २०२६ : मोशी येथील कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेत नऊ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा, घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी पिंपरी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात फौजदारी तक्रार अर्ज सादर केला आहे.

८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळला होता. या दुर्घटनेत नऊ कंत्राटी कामगारांना जीव गमवावा लागला, तर १४ कामगारांची सुटका करण्यात आली होती. या घटनेमुळे प्रकल्पातील कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि कचरा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

दुर्घटनेनंतर १३ जुलै रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाच्या अनुषंगाने महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

मात्र, केवळ प्राथमिक कारवाईपुरते हे प्रकरण मर्यादित राहू नये, अशी भूमिका संदीप वाघेरे यांनी मांडली आहे. दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांची भूमिका तपासली जावी, अशी त्यांची मागणी आहे.

प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्था, कचरा व्यवस्थापनाची पद्धत, तांत्रिक बाबी, प्रशासकीय देखरेख आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे वाघेरे यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी वाघेरे यांनी यापूर्वी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाकडे तक्रार अर्ज आणि निवेदने सादर करून पाठपुरावा केला होता. मात्र, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची भूमिका घेत त्यांनी आता न्यायालयीन मार्ग स्वीकारला आहे.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित व्हावी, दुर्घटनेमागील सत्य समोर यावे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणाचा न्यायालयीन आणि प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे संदीप वाघेरे यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयात सादर करण्यात आलेल्या फौजदारी तक्रार अर्जावर पुढे कोणती कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories