पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्विकारला
पिंपरी, ता. १७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (ता. १६) प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. महापौर रवी लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी नागरी सुविधा, प्रकल्पांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, '' शहरातील लोकसंख्यावाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षांचा विचार करुन पाण्याचे स्रोत वाढविण्यावर भर देणार आहे. ठोकळवाडी, मुळशी धरणांतून पाणी आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल." "भामा आसखेड जलवाहिनीचा ठेकेदार बडतर्फ केला आहे. उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. हे काम पूर्ण होण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर रोज पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असेल. पवना बंदिस्त जलवाहिनी कामाचा ठेकेदार लवादमध्ये गेला आहे. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. आंद्रातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरु केले जाईल." असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
विविध सुविधांबाबत बोलताना ते म्हणाले, ''शहरातील कचऱ्याचे परिपूर्ण व्यवस्थापन करण्यासाठी 'बायोमायनिंग' प्रक्रियेवर भर दिला जाईल, सध्या कार्यरत असलेल्या 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाची क्षमता वाढविली जाईल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर निर्माण करण्यासाठी प्रदूषणमुक्तीवर भर दिला जाईल. यासंबंधीच्या उपाययोजना राबविण्यावर भर असेल. सांडपाणी व्यवस्थापनावर भर दिला जाईल. महापालिकेच्या ५० टक्के शाळांमधील सुविधा वाढवण्यावर व भर दिला जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवले जातील.''
''महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठीच्या सर्वेक्षणात तीन लाख ७० हजार नवीन, वाढीव मालमत्ता आढळल्या आहेत. त्यांपैकी एक लाख ४२ हजार मालमत्तांना कर आकारणी सुरु केली आहे. उर्वरित मालमत्तांनाही कर कक्षेत आणले जाईल. थकबाकीची सर्व जुनी प्रकरणे निकाली काढली जातील. त्यासाठी एक एप्रिलपासून कार्यवाही केली जाईल'', असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले.