news
clock
पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ८ हजारांहून अधिक कुटुंबांना मिळणार स्वतःचे घर

पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ८ हजारांहून अधिक कुटुंबांना मिळणार स्वतःचे घर

पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ८ हजारांहून अधिक कुटुंबांना मिळणार स्वतःचे घर

पिंपरी, ता. २१ - पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी महापालिकेकडून गृहप्रकल्प तयार होणार आहेत. किवळे व डुडुळगावमध्ये प्रकल्पाचे काम सुरु आहे. हे आठ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ८ हजार ७४५ कुटुंबांना स्वतःचे घर मिळणार आहे. या प्रकल्पांसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. 

रावेत येथील ९३४ सदनिकांचा गृहप्रकल्प न्यायालयात वाद गेल्याने आणि मुदतीमध्ये जागा ताब्यात न आल्याने रद्द करण्यात आला. या गृहप्रकल्पाचा समावेश पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. रावेतसह मामुर्डी, पुनावळे, तडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी येथील प्रकल्पही दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होणार आहेत.  

किवळे, रावेत, पुनावळे, वडमुखवाडी, मामुर्डी या पाच ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प असणार आहेत आणि ताथवडे, चोविसावाडी आणि डुडुळगाव या तीन ठिकाणी बेघरांसाठी (HDH - Homeless / High Density Housing)  गृहप्रकल्प असणार आहे. रावेत येथील १ हजार ८ सदनिकांच्या गृहप्रकल्पास मंजुरी मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच, निविदा प्रक्रिया राबवून काम सुरु केले जाणार आहे. या प्रकल्पांतील प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ

४८४ चौरस फूट असणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आता ६ लाख इतकी आहे. 

जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु

''पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आतापर्यंत चार प्रकल्पांतील ३ हजार ६६८ सदनिकांचे वितरण केले आहे. अंतिम टप्प्यातील डुडुळगाव गृहप्रकल्पातील १ हजार १९० सदनिकांची सोडत काढली आहे. मामुर्डीत ८००, पुनावळेत १२००, वडमुखवाडीत १२००, ताथवडेत २४००, चोविसावाडीत १,२००, अशा ६,८०० सदनिकांच्या प्रकल्पांसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.''

- हरविंदरसिंह बन्सल, महापालिकेचे कार्यकारी अभियंता

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories