सखी अंगणमधील बचत गटांच्या गाळेवाटपात अनियमिततेचा आरोप; ई-टेंडरिंग प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी
आकुर्डी | 11 सप्टेंबर 2026 : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत आकुर्डी येथील सखी अंगणमध्ये बचत गटांना देण्यात आलेल्या गाळ्यांच्या वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष विकी रोहिदास पासोटे आणि सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ जावीर यांनी केला आहे. या प्रक्रियेची तातडीने चौकशी करून ई-टेंडरिंग नव्याने राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पासोटे आणि जावीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाळेवाटपाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली असता काही बचत गटांच्या नावावर एकापेक्षा अधिक गाळे असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय काही संस्थांच्या नोंदणीच्या तारखांमध्ये विसंगती असल्याचा तसेच गाळ्यांचे भाडे आणि अनामत रकमेबाबतही प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कथित अनियमितता समोर आल्याचे पासोटे आणि जावीर यांनी म्हटले आहे. समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी गाळेवाटपाशी संबंधित सर्व अर्ज, बचत गटांची नोंदणी प्रमाणपत्रे, पात्रता निकष, ई-टेंडरिंग प्रक्रियेतील कागदपत्रे, भाडेकरार आणि अनामत रकमेच्या नोंदींची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्या राबविण्यात आलेली ई-टेंडरिंग प्रक्रिया रद्द करून सर्व पात्र बचत गटांना समान संधी मिळेल अशा पारदर्शक पद्धतीने ती पुन्हा राबवावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. संपूर्ण गाळेवाटप प्रक्रियेची स्वतंत्र आणि प्रत्यक्ष पडताळणी करावी तसेच एकाच बचत गटाला अथवा संबंधित व्यक्तींना एकापेक्षा अधिक गाळे देण्यात आले आहेत का, याचीही खातरजमा करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
चौकशीमध्ये नियमांचे उल्लंघन किंवा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा व्यक्तींविरोधात कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. गाळेवाटप प्रक्रियेत पारदर्शकता राखल्यास प्रत्यक्षात कार्यरत आणि पात्र महिला बचत गटांना न्याय मिळेल, असे पासोटे आणि जावीर यांनी नमूद केले.
दरम्यान, या आरोपांबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. विभागाची बाजू प्राप्त झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.