काळेवाडीमध्ये पाच फूट खोल पाईपलाईनच्या व्हॉल्व्हमध्ये अडकला आजींचा पाय, दोन तासांनी सुखरुप सुटका
काळेवाडीमध्ये पाच फूट खोल पाईपलाईनच्या व्हॉल्व्हमध्ये अडकला आजींचा पाय, दोन तासांनी सुखरुप सुटका
पिंपरी, ता. १३ - काळेवाडी परिसरात बुधवारी (ता. १३) चालता-चालता पाईपलाईनच्या उघड्या व्हॉल्वमध्ये एका आजींचा पाय अडकला.... पाईपातून पाय निघेना....जमलेले लोकही हतबल झाले....आजी पुरत्या घाबरुन गेल्या....अग्निशामक दल बोलावले अन् सुरु झाला आजींच्या सुखरुप सुटकेचा थरार. अखेर दोन तासांनी अग्निशामक दलाच्या जवानांनी आजींचा पाय पाईपातून सुखरुपणे बाहेर काढला.
स्मिता भागवत कासारे (वय 65 वर्षे) या आजी दुपारी बाराच्या सुमारास त्या काळेवाडी भागात पायी निघाल्या होत्या. रस्त्यात जमीन आणि व्हॉल्व समांतर पातळीत असल्याने व्हॉल्व्हचा खड्डा आज्जींच्या लक्षात आला नाही. अचानक आज्जींचा पाय त्या व्हॉल्ववर पडला आणि गुडघ्यापर्यंत अडकला. पाय बाहेर काढण्यासाठी आजींनी आटापिटा केला पण पाय निघेना. लोक जमले, त्यांनी प्रयत्न केले पण आजींचा पाय अडकलेलाच राहिला. आजी पुरत्या घाबरुन गेल्या होत्या. नागरीकांनी त्यांना दिलासा देत अग्निशमन दलाला बोलावले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रत्यक्ष पाहणी केली तर, चार ते पाच फूट खोल व्हॉल्वमध्ये पाय अडकलेला होता, फायबरचा हा व्हॉल्व जमिनीला समांतर होता. आजींच्या पायाला इजा न पोहचू देता, त्यांची सुखरुप सुटका करायची होती. मग, आजींना दिलासा देत जवानांनी व्हॉल्वच्या बाजूने खोदकाम सुरु केले, चार ते पाच फूट खड्डा खणून पाईप बाहेर घेण्यात आला. त्यानंतर पाईप कापून करुन आज्जींची सुखरुप सुटका करण्यात आली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मात्र, या घटनेनंतर तरी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनीधी शहरातील पाईपलाईनच्या उघड्या व्हॉल्व्हसारख्या अनेक अरसुक्षित गोष्टींवर कार्यवाही करण्यासाठी जागे होणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.