news
clock
तरुणाईला प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरु

तरुणाईला प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरु

तरुणाईला प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरु

पुणे, ता. १३ - तरुणाना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रमासाठी अर्जप्रक्रिया ८ मेपासून सुरु झाली आहे. यामध्ये, तरुणत-तरुणींना शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडते. पहिल्या टप्प्यात सर्व अर्जदारांना ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी (Objective Test) व निबंध चाचणी (Essay Test) देणे आवश्यक आहे. ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी ही दुसऱ्या टप्प्यासाठी पात्रता निश्चित करणारी (qualifying) चाचणी आहे. या चाचणीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी, म्हणजे वैयक्तिक मुलाखतीसाठी (Personal Interview), पात्र ठरविण्यात येते. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे आहे. 

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना शासनाचा भाग बनून काम करण्याची संधी देतो. यामध्ये तरुणाईच्या नाविन्यपूर्ण कल्पनांची प्रशासनास मदत होते. फेलोंचा उत्साह व तंत्रज्ञानाची समज यामुळे प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान व अनुभव यामुळे तरुणाईचा दृष्टिकोन विस्तारतो, असे शासनाने सांगितले आहे.


''युवकांसोबत काम करणे नेहमीच आनंददायक असते. बुद्धिमत्ता व हिम्मत ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची सर्जनशीलता व उत्साह आपल्याला भुरळ घालत हा लोकसांख्यिकी लाभांহা (demographic dividend) महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा ठरणार आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे तरुण आणि तेजस्वी मुलांना शासनाचा भाग बनून काम करण्याची संधी मिळते.

महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी आमच्या सोबत येण्याचे मी माझ्या सर्व तरुण मित्रांना आवाहन करतो.'', असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणाईला दिला आहे. 

थोडक्यात - मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६-२७ साठी अर्ज mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे २०२६ आहे, आणि या कार्यक्रमात निवडीसाठी पदवीधरांना ६१,५०० रुपये मासिक मानधन दिले जाईल.


पात्रता -

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२६ करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:

1. उमेदवाराचे वय अर्ज सुरू झाल्याच्या पहिल्या दिनांकास म्हणजे 8 मे, 2026 रोजी किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे. दिनांक 08 / 05 / 2000 ते दिनांक 08 / 05 / 2005 या दरम्यान (दोन्ही दिवस अंतर्भूत) जन्मलेल्या व्यक्ती मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२६ साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

2. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) असावा.

3. उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.

4. मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

स्वरूप-

1. फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल.

2. निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल.

या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल.

3. प्राधिकरणावरील नेमणुकीचा/प्लेसमेंटचा निर्णय अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.

4. नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.

5. फिल्ड वर्क सोबतच आयआयटी बॉम्बे, मुंबई यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल.

6. फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल.

















Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories