लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींचा फेब्रुवारीचा हफ्ता २७ मार्चपासून जमा होण्यास सुरवात
Mar 27 2026
23
लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींचा फेब्रुवारीचा हफ्ता २७ मार्चपासून जमा होण्यास सुरवात
पुणे, ता. २७ - लाडकी बहीण योजना हफ्ता रखडल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली होती. शुक्रवारपासून (ता. २७ मार्च) पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपये हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र महिलांना त्यांचे पैसे मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी २२७ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे.
अदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून (ता. २७) सुरु झाली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे."
"महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' यशस्वीपणे पुढेही सुरू राहील, असा मला विश्वास आहे." असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.