आमदार अमित गोरखे यांची शेतकऱ्यांना मदत; मुख्यमंत्री निधीत २.५१ लाखांचा धनादेश

आमदार अमित गोरखे यांची शेतकऱ्यांना मदत; मुख्यमंत्री निधीत २.५१ लाखांचा धनादेश

पिंपरी-चिंचवड | ४ नोव्हेंबर २०२६ : वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सत्कार, स्वागत आणि फराळावरील खर्च टाळून विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. मंत्रालयात झालेल्या सदिच्छा भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा धनादेश दिला.

वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा किंवा सत्कार करून घेण्याचा दिवस नसून, समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवण्याची संधी असल्याची भूमिका आमदार गोरखे यांनी मांडली. त्यामुळे वैयक्तिक आनंदाचा हा दिवस समाजोपयोगी उपक्रमासाठी समर्पित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

राज्यातील काही भागांतील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर त्यांना आर्थिक आधार मिळणे आवश्यक आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचे गोरखे यांनी सांगितले.

मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार गोरखे यांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केल्याची माहिती देण्यात आली आहे. वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगी समाजोपयोगी उपक्रम राबवणे इतर लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, "संकटाच्या काळात आपल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे, हे मी माझे सामाजिक कर्तव्य मानतो. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याची परतफेड समाजसेवा करूनच करणे माझे ध्येय आहे."

वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांवर खर्च करण्याऐवजी ती रक्कम गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतल्याने सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न गोरखे यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष वेधणे आणि त्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष आर्थिक योगदान देणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयाचे पिंपरी-चिंचवड शहरासह विविध स्तरांतून स्वागत होत असल्याचे प्रसिद्धीसाठी दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories