PCMC स्थायी समिती सभा : अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांना मंजुरी

PCMC स्थायी समिती सभा : अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड | ४ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात ही सभा पार पडली. यामध्ये रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, आरोग्य सेवा, नागरी सुविधा, क्रीडा क्षेत्र आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या शहरातील खेळाडूंना आर्थिक साहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या सभेत घेण्यात आला. प्रांशु सदाशिव सूर्यवंशी यांना इजिप्तमधील ज्युनिअर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रवास, प्रवेश शुल्क, निवास आणि भोजन खर्चासाठी मदत मंजूर करण्यात आली. साजिद करीम तांबोळी आणि अन्वर मुक्तार अन्सारी यांना सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी आर्थिक साहाय्य व क्रीडा शिष्यवृत्ती देण्यास मान्यता मिळाली.

तसेच प्रणीत गणेश आढाव यांना हाँगकाँगमधील आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी आणि स्नेहा एस. कमलदिन्नी यांना आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले. प्रगती गायकवाड यांच्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हिंद केसरी स्पर्धेसाठी मदत देण्यासही मान्यता देण्यात आली.

आरोग्य सुविधांच्या दृष्टीने महापालिका रुग्णालयांसाठी अत्याधुनिक वॉशिंग मशीन खरेदी करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. नवीन भोसरी आणि जिजामाता रुग्णालयातील NBEMS-DNB अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ७८ प्रकारची वैद्यकीय पुस्तके खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. जिजामाता रुग्णालयातील किरण सी आर्म आणि एक्स-रे मशीनचे निकामी झालेले सॉफ्टवेअर बदलून यंत्रणा कार्यान्वित करण्यासही मंजुरी मिळाली.

शहरातील रस्ते आणि नागरी सुविधांसाठी विविध प्रभागांमधील कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, मोशी, डुडुळगाव, खराळवाडी, कामगारनगर, यशवंतनगर, उद्यमनगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगर आणि इंदिरानगर परिसरातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण आणि स्थापत्यविषयक कामांचा समावेश आहे.

तसेच चक्रपाणी वसाहत, सद्गुरुनगर, लांडगेवस्ती, धावडेवस्ती, गुळवेवस्ती, भगतवस्ती, देवकरवस्ती आणि महादेवनगर परिसरातील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती आणि हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या निविदांनाही मान्यता देण्यात आली.

एम्पायर इस्टेट परिसरातील नाल्याची दुरुस्ती, चिखली मोरेवस्ती परिसरातील स्टॉर्म वॉटर लाईन, जुनी सांगवी येथील इंद्रप्रस्थजवळील नाल्याच्या प्रवाहाची दिशा बदलणे आणि घाट परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.

याशिवाय चिखली सेक्टर क्रमांक १७ आणि १९ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गृहप्रकल्पातील उर्वरित सीमाभिंत, प्रधानमंत्री आवास योजनेतील इमारतींची दुरुस्ती, तळवडे स्मशानभूमीची देखभाल आणि विविध प्रभागांतील नागरी सुविधांच्या कामांना मान्यता मिळाली.

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील १०० गणेश विसर्जन स्थळांसाठी निर्माल्य संकलन कलश खरेदी व वितरणाच्या आदेशाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. तसेच वाकड येथील सावित्रीबाई फुले अकादमीच्या संचालकपदावरील कराराला मुदतवाढ देण्यास आणि सीएसआर व सीईआर उपक्रमांसाठी नियुक्त सल्लागाराच्या कराराला मुदतवाढ देण्यासही मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीच्या या सभेत शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी विविध विभागांच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आले. मंजूर विकासकामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर संबंधित परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories