पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्यावर लाचखोरी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. महापालिका आयुक्तांनी ओंभासे यांना सेवानिलंबित करण्याचे आदेश जारी केले असून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे. लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाईनंतर महापालिका प्रशासनानेही प्रशासकीय स्तरावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
प्रमोद ओंभासे हे स्थापत्य मुख्य कार्यालयात मुख्य अभियंता-२ या गट-अ पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे स्थापत्य, स्थापत्य प्रकल्प, उद्यान व क्रीडा तसेच पर्यावरण विभागाशी संबंधित कामकाजाची जबाबदारी होती. मात्र, पाणीपुरवठा विभागातील देखभाल-दुरुस्ती आणि नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी लाच मागितल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी एसीबीने कारवाई करत 29 ऑक्टोबर रोजी त्यांना अटक केली होती. ओंभासेंविरोधात
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ नुसार, ओंभासेंच्या निलबंनाचे आदेश जारी केले. तर नियम 8 नुसार, विभागीय चौकशी सुरू करण्यासही मान्यता दिली आहे.
निलंबनाच्या कालावधीत ओंभासे यांचे मुख्यालय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थापत्य मुख्य कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. या काळात नियमानुसार, निर्वाह भत्ताही देण्यात येणार आहे. तसेच निलंबन आदेशाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्राबाबत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विभागीय चौकशी अधिकारी आणि सादरकर्ता अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही आवश्यकतेनुसार तातडीने करण्याचे आदेशात नमूद आहे. लाचखोरीच्या प्रकरणात अटकेनंतर मुख्य अभियंतावर झालेल्या या कारवाईने प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.