'एमएनजीएल' पाइपद्वारे नैसर्गिक गॅस कनेक्शनचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेणार
पुणे, ता. २७ - आखाती देशातील युद्धामुळे आपल्या देशात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पाइपद्वारे नैसर्गिक गॅस वापराला (पीएनजी) प्रोत्साहन दिले आहे. 'पीएनजी'ची सुविधा असेल तेथे हे कनेक्शन घेणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) मोठ्या प्रमाणात नवीन जोडणी देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
याबाबत, महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडने माहिती देताना सांगितले आहे की, 'पीएनजी'चे उत्पादन देशांतर्गत होते आणि त्याचा मोठा साठादेखील आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने वितरण सध्या केले जात आहे. ज्या सोसायटीत 'पीएनजी'ची लाईन आहे, तेथील रहिवाशांनी नवीन जोडणी घेतल्यानंतर त्यांना दीड हजार रुपयांची सवलत दिली जाणार आहे. नवीन भागांमध्ये जोडणीची विनंती आल्यानंतर त्यांना लवकरात लवकर जोडणी दिली जाईल. सध्या शहरातील सर्वांत जास्त सोसायटी असलेल्या भागांमध्ये आणि बैठी घरे असलेल्या भागांमध्येही पीएनजी उपलब्ध आहे. तांत्रिक दृष्ट्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या सर्वच भागात अधिकाधिक जोडणी देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
'पीएनजी'ची नवीन पाइपलाइन टाकताना विविध परवानग्या, जास्त शुल्क आणि जमीन उपलब्धतेतील अडचणी यामुळे जोडणीसाठी वेळ लागायचा. आता नवीन नियमांत परवानगी प्रक्रिया सुलभ केली आहे.
त्यानुसार सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील संस्थांना ठराविक कालमयदित पाइपलाइनसाठी परवानगी देणे बंधनकारक असेल.
पीएनजी लाईन उपलब्ध असलेल्या ठिकाणी त्याची जोडणी घेणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. त्यानुसार एमएनजीएलने नियोजन सुरु केले आहे. जोडणीचा अर्ज आल्यानंतर त्वरित पुरवठा सुरु केला जात आहे, असे महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडने सांगितले आहे.