७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा PCMC सर्वसाधारण सभेत सन्मान

७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा PCMC सर्वसाधारण सभेत सन्मान

पिंपरी-चिंचवड | ३१ ऑक्टोबर २०२६ : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीला लागलेल्या भीषण आगीत प्रसंगावधान राखून सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविण्यास मदत करणाऱ्या आर्या विजय कांबळे (वय २० वर्षे) हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान करण्यात आला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इमारतीतील नागरिकांना सावध करणाऱ्या आर्याच्या धाडसाचे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

चिंचवडमधील कुणाल मार्केट इमारतीमध्ये सुमारे ४० दुकाने आणि ३८ सदनिका आहेत. या इमारतीच्या पार्किंग परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली होती.

पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे आर्याच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिने तातडीने आरडाओरडा करत इमारतीतील नागरिकांना आगीची माहिती दिली.

आगीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन आर्याने इमारतीतील नागरिकांना सुरक्षिततेसाठी टेरेसवर जाण्यास सांगितले. त्याचवेळी तिने अग्निशमन विभागालाही घटनेची माहिती दिली.

माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर टेरेसवर अडकलेल्या नागरिकांना शेजारील इमारतीत सुरक्षितपणे हलविण्यात आले.

आर्याने वेळीच दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे आणि अग्निशमन दलाने केलेल्या बचावकार्यामुळे सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविण्यास मदत झाली.

आर्या विजय कांबळे ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये डिझाइन विषयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. अवघ्या २० व्या वर्षी तिने दाखविलेल्या प्रसंगावधानाचे आणि सामाजिक जबाबदारीचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

या धाडसी कार्याची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आर्या कांबळेचा विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुलदीप जंगम उपस्थित होते.

तसेच महापालिकेचे अन्य पदाधिकारी, नगरसदस्य आणि अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता इतरांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेण्याची आर्याने दाखविलेली वृत्ती प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

वेळीच सतर्कता दाखवून मोठी जीवितहानी टाळण्यास मदत करणाऱ्या आर्या कांबळेच्या धाडसाचा महापालिकेने विशेष सन्मान केला. तिच्या या कार्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान आणि तत्परतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories