PCMC महापौर चषक किल्ले बनवा स्पर्धा २०२६; प्रथम पारितोषिक ₹५१ हजार

PCMC महापौर चषक किल्ले बनवा स्पर्धा २०२६; प्रथम पारितोषिक ₹५१ हजार

पिंपरी-चिंचवड | ३१ ऑक्टोबर २०२६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांची परंपरा आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सेवा सारथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महापौर चषक भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवप्रेमी, किल्लेप्रेमी, गृहनिर्माण सोसायट्या आणि तरुण मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी एकूण सहा रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी ११ हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी १० हजार रुपये आणि सहाव्या क्रमांकासाठी ७ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

विजेत्या संघांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेच्या नियमांनुसार, प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी किंवा विंगमधून एक किल्ला साकारता येणार आहे. प्रत्येक संघामध्ये जास्तीत जास्त पाच सदस्य असू शकतील.

किल्ल्यांचे परीक्षण करताना किल्ल्याची ऐतिहासिक माहिती, नैसर्गिक साहित्याचा वापर, कलात्मक मांडणी आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश या बाबींना विशेष महत्त्व दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे.

२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून किल्ल्यांचे परीक्षण करण्यात येणार आहे. तर विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता प्रत्येक घरात, सोसायटीत आणि नव्या पिढीच्या मनात रुजावा, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

‘किल्ले घडवूया, इतिहास जपूया, देशभक्ती वाढवू या!’ हे स्पर्धेचे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

महापौर रवी लांडगे आणि सेवा सारथी फाउंडेशनच्या सदस्यांनी शहरातील नागरिकांना स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाची माहिती सेवा सारथी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ओंकार गंगाधर मांडगे यांनी दिली.

स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी सेवा सारथी फाउंडेशनच्या ७३५००४६६२५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच कार्तिक चव्हाण (७२७६३५८७०३), आदर्श बोर्सुने (७२४९६८४८१८), ओंकार मांडगे (८४२१८४६६२५) आणि स्वरूप कबाडे (८३९००८७३१२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories