पिंपरी | ३० ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी चिखलीतील जाधववाडी येथे ‘एसकेएफ एम्प्लॉयबिलिटी अँड आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट’ (SEED) केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने आणि एसकेएफ इंडिया (इंडस्ट्रियल) लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. देशातील पहिले गव्हर्नमेंट-कॉर्पोरेट कौशल्य विकास सीड केंद्र असल्याचे या उपक्रमाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
या केंद्राच्या पहिल्या तुकडीतील १०० विद्यार्थ्यांना ३०० तासांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये शॉप फ्लोअर टेक्निशियन आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रीशियन या दोन क्षेत्रांसाठी युवकांना तयार केले जाणार आहे.
प्रशिक्षणात प्रत्यक्ष तांत्रिक कामकाज, उत्पादन क्षेत्रातील सुरक्षित कार्यपद्धती, संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, कार्यस्थळावरील आवश्यक कौशल्ये, डिजिटल साक्षरता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) प्राथमिक ओळख यांचा समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळविण्याच्या प्रक्रियेपर्यंत विद्यार्थ्यांना सहाय्य केले जाणार आहे.
दहावी, बारावी, आयटीआय तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम खुला आहे. उत्पादन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष जनजागृती आणि संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिका, एसकेएफ इंडिया, टाटा स्ट्राइव्ह आणि बॉश इंडिया फाउंडेशन यांचा सहभाग आहे. महापालिका पायाभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरील सहकार्य उपलब्ध करून देणार आहे. टाटा स्ट्राइव्ह युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी योगदान देणार असून, बॉश इंडिया फाउंडेशन उद्योगमानकांवर आधारित अभ्यासक्रम, प्रशिक्षक विकास आणि प्रशिक्षणार्थींच्या मूल्यमापनासाठी सहकार्य करणार आहे.
एसकेएफ इंडिया (इंडस्ट्रियल)चे व्यवस्थापकीय संचालक सुजीथ पै यांनी सांगितले की, भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या प्रगतीसाठी आधुनिक पायाभूत सुविधांबरोबरच कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. सीड केंद्रातून तांत्रिक प्रशिक्षण, डिजिटल आणि एआय कौशल्ये, मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे आणि रोजगारासाठी सहाय्य देण्यावर भर राहणार आहे.
टाटा स्ट्राइव्हचे मुख्य परिचालन अधिकारी अमेया वंजारी यांनी कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजांमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता व्यक्त केली. उद्योग, प्रशासन आणि प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने उत्पादन क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर रवी लांडगे यांनी शहराच्या औद्योगिक प्रगतीचा लाभ स्थानिक युवकांना मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. सीड उपक्रम ही युवकांच्या भविष्यातील गुंतवणूक असून, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी युवकांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षणाला उद्योगांच्या गरजांशी जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रशासन आणि उद्योग यांच्या भागीदारीतून प्रशिक्षणापासून रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त डॉ. कुलदीप जंगम, सहआयुक्त मनोज लोणकर, प्राचार्य शशिकांत पाटील, विष्णू साबळे, विक्रम आळोखे, सोमनाथ शिंदे उपस्थित होते. एसकेएफतर्फे प्रशांत हांडे, शशी शेट्टी, मयूर देशमुख आणि प्रियंका दास, तर टाटा स्ट्राइव्हतर्फे अनिता राजन, प्रदीप लिंगावत, व्यंकट रायडू, श्वेता बक्शी, अक्षय शेट्टी, प्रणोती आवलेकर आणि रमेश बलवडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता राजन यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती गोरे यांनी केले, तर मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी आभार मानले.
या केंद्रामुळे पिंपरी-चिंचवडमधील युवकांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.