महाराष्ट्र EV निर्मितीचे प्रमुख केंद्र बनणार; महामार्गांवर चार्जिंग नेटवर्क

महाराष्ट्र EV निर्मितीचे प्रमुख केंद्र बनणार; महामार्गांवर चार्जिंग नेटवर्क

पुणे | ३१ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही शहरे इलेक्ट्रिक वाहन उद्योगाची महत्त्वाची केंद्रे म्हणून विकसित होत आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधांचे जाळे उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुण्यात ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समूहाच्या सहा नवीन उत्पादन सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, बी. एल. संतोष, ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, ईकेए मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता आणि सुनंदा मेहता उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वच्छ आणि हरित वाहतूक व्यवस्था ही महाराष्ट्राच्या प्रमुख प्राथमिकतांपैकी एक आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे प्रदूषण कमी करण्यास आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व घटविण्यास मदत होईल.

पुढील तीन वर्षांत महाराष्ट्राला सुमारे ५० हजार इलेक्ट्रिक बसची आवश्यकता भासणार आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यातील वाहन उत्पादक कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

इलेक्ट्रिक वाहनांच्या विस्तारासाठी हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख महामार्गांवर चार्जिंग केंद्रांचे जाळे उभारण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला असून, वाहन उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या चार्जिंग सुविधांसाठी आवश्यक जागा, परवानग्या आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. इलेक्ट्रिक वाहनांसाठी किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही केले जाणार आहेत.

पिनॅकल समूहाच्या एका उत्पादन सुविधेत ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीचा भागधारक बनविण्याच्या मॉडेलचेही त्यांनी कौतुक केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय वाहन उद्योगाने जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे सांगितले. इलेक्ट्रिक बस आणि ट्रक निर्मितीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन बॅटरी तंत्रज्ञान, संशोधन, स्वदेशी उत्पादन आणि नवकल्पनांवर भर देण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली. चार्जिंग सुविधा अधिक किफायतशीर करणे, वाहतूक खर्च कमी करणे आणि इंधन आयात घटविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच जैवइथेनॉल आणि हायड्रोजनवर आधारित वाहनांच्या विकासाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. स्टार्टअप, तरुण अभियंते, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांना वाहन उद्योगाशी जोडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, वाहन सॉफ्टवेअर आणि हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली. स्वदेशी उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताने जागतिक मोबिलिटी क्षेत्रात नेतृत्व करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळामुळे राज्य आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे केंद्र ठरत असल्याचे सांगितले. ईकेए समूहाच्या इलेक्ट्रिक बस भविष्यात पुणे आणि मुंबईच्या रस्त्यांवर धावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्पादन, संशोधन, विकास आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी उद्योग समूहाचे अभिनंदन केले. पुण्यातील पाच उत्पादन प्रकल्पांमधून हजारो रोजगार निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ईकेए मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांनी उद्योग समूहाची वाटचाल, औद्योगिक क्षेत्रातील योगदान आणि भविष्यातील विस्तार योजनांची माहिती दिली.

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढविणे, चार्जिंग सुविधांचा विस्तार करणे आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करणे या माध्यमातून राज्यातील वाहन उद्योगाला चालना देण्याचा सरकारचा मानस असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories