Grindr डेटिंग ॲपवरून भेटायला बोलावून चाकणमध्ये तरुणाला मारहाण; ऐवज लुटला

Grindr डेटिंग ॲपवरून भेटायला बोलावून चाकणमध्ये तरुणाला मारहाण; ऐवज लुटला

चाकण | २९ ऑक्टोबर २०२६ : डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख करून भेटण्यासाठी बोलावलेल्या एका ३० वर्षीय तरुणाला चाकणमधील चक्रेश्वर मंदिराजवळ मारहाण करून रोख रक्कम, मोबाईल आणि पॉवर बँक जबरदस्तीने घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री चाकण गावातील चक्रेश्वर मंदिर रस्त्याच्या परिसरात घडली. याप्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, डेटिंग ॲपवरून संपर्क साधल्यानंतर एका व्यक्तीने मोबाईलवर फोन करून त्यांना चाकण येथील चक्रेश्वर मंदिराच्या बाजूच्या मैदानात भेटण्यासाठी बोलावले.

त्यानुसार फिर्यादी रात्री सुमारे ८ वाजून ३० मिनिटांनी मोटारसायकलवरून संबंधित ठिकाणी गेले. काही वेळाने एक तरुण मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने स्वतःचे नाव प्रेम असल्याचे सांगितले. त्याचे संपूर्ण नाव आणि पत्ता माहीत नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर संबंधित तरुणाने फिर्यादीच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली आणि त्यांना बाजूला नेले. त्याच वेळी इतर तरुण तेथे आले. त्यांनी कोणतेही कारण नसताना फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीदरम्यान फिर्यादीकडील १८ हजार रुपये रोख, एमआय कंपनीची मोबाईल पॉवर बँक आणि २६ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपींनी फिर्यादीकडून मोबाईलचा स्क्रीन लॉक आणि गुगल पेचा पासवर्ड विचारून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने सांगितले.

या प्रकरणात रिहान सरदार शेख (वय १९ वर्षे, रा. ओमसाईनगर, खंडोबामाळ, चाकण) आणि सुजल सचिन डोंगरे (वय २१ वर्षे, रा. वाडेकर मिसळ शेजारी, चाकण) यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. तसेच प्रेम नाव सांगणाऱ्या तरुणाचाही तक्रारीत उल्लेख आहे.

या घटनेनंतर घाबरलेले फिर्यादी घरी निघून गेले. घरच्यांनी धीर दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२१/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories