पिंपरी | ३० ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत शहरातील विविध प्रभागांमधील रस्ते विकास, डांबरीकरण, रुग्णालयांची देखभाल, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि नागरी सुविधांशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात ही सभा पार पडली.
सभेत चिंचवड येथील तालेरा रुग्णालयातील HVAC, ऑपरेशन थिएटर आणि विद्युत यंत्रणेच्या पुढील दोन वर्षांच्या चालन, देखभाल व दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. तसेच वायसीएम रुग्णालयातील डिजिटल रेडिओग्राफी सिस्टीमच्या देखभालीसाठी मूळ उत्पादक कंपनीसोबत करार करण्यास मान्यता मिळाली.
प्रभाग क्रमांक १९ मधील सुदर्शननगर हेल्थ क्लबजवळील जुने सी.डी. वर्क पाडून नवीन बांधण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत परिसरातील ताब्यात आलेले डीपी आणि नॉन-डीपी रस्ते विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची QCBS पद्धतीने नियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली.
याशिवाय प्रभाग क्रमांक २२ मधील पवनानगर आणि आदर्शनगर परिसरातील रस्त्यांचे २०२६-२७ या वर्षात हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
आकुर्डी गावठाण आणि परिसरातील स्ट्रॉर्म वॉटर लाईन, पदपथ आणि इतर स्थापत्य कामांसाठी करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक १५ मधील महापालिका इमारतींची दुरुस्ती, फर्निचर आणि देखभालीच्या कामांनाही मंजुरी मिळाली.
प्रभाग क्रमांक ९ मधील नेहरूनगर आणि विठ्ठलनगर परिसरात पदपथ उभारणी, तसेच प्रभाग क्रमांक १० मधील शाहूनगर भागात रोड फर्निचरची कामे करण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ६ मधील धावडेवस्ती आणि गुळवेवस्ती, प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर १, २, ३, ४ आणि ६, तसेच प्रभाग क्रमांक २० मधील विशाल थिएटर, संत तुकारामनगर, कासारवाडी आणि एमआयडीसी परिसरातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, स्ट्रॉर्म वॉटर चेंबर्स आणि नाल्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पात्र निविदांना मंजुरी देण्यात आली. स्मशानभूमीतील स्थापत्य कामांचाही यात समावेश आहे.
दिघी-बोपखेल, चोविसावाडी, वडमुखवाडी, मोशी, डुडूळगाव आणि इतर परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आणि दिशादर्शक फलक उभारण्याच्या कामांनाही मान्यता मिळाली.
दापोडी, निगडी आणि दिघी येथील पाच मुस्लिम व लिंगायत दफनभूमींच्या देखभालीसाठी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित धर्मादाय संस्थांना किमान वेतन दरानुसार एक महिन्याची मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली.
पुणे-नाशिक रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती ते सीएनजी पंप या मार्गावरील पथदिवे, सजावटीचे विद्युत खांब आणि हायमास्ट दिवे कार्यान्वित करण्यासाठी महावितरणला आवश्यक शुल्क अदा करण्यास मान्यता देण्यात आली.
तसेच ‘ड’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपण, सीसीटीव्ही, जनरेटर आणि प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या निविदांनाही मंजुरी मिळाली.
प्रभाग क्रमांक १६, १७, १८ आणि २२ मधील कामांसाठी वाहन, इंधन आणि चालकासह रिक्षा-टेम्पो व्यवस्थेला नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आठ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या मुदतवाढीसंदर्भातील प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली.
शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीने सांगवी येथील महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ई-लर्निंग मॉड्यूल आणि व्हर्च्युअल प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या खर्चाच्या प्रस्तावाचे स्थायी समितीने अवलोकन केले. तसेच कासारवाडी येथील महिला आयटीआयमध्ये अतिवृष्टीमुळे आवश्यक झालेल्या साहित्य खरेदीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
या निर्णयांमुळे शहरातील रस्ते, आरोग्यसेवा, स्वच्छता, पथदिवे आणि इतर मूलभूत नागरी सुविधांच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.