पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी
Mar 17 2026
75
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी
पिंपरी, ता. १७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला सोमवारी (ता. १६) महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी ४०६ कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली. अर्थसंकल्पामध्ये शहरातून आलेला २५० उपसूचनांचा विचार करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पाबाबत बोलताना अभिषेक बारणे म्हणाले, '' शहराच्या महसुलात मोठी वाढ करण्यासाठी बांधकाम परवानगी, आकाशचिन्ह, कर संकलन आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून सुमारे ३५० ते ४०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नगरसेवकांसाठी १० लाख रुपयांचा विकास निधी प्रस्तावित आहे. शहरभरातून आलेल्या सुमारे २५० उपसूचनांचा विचार अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे.''
''महापालिकेच्या ठेवी सुरक्षित असून त्या विनाकारण मोडल्या जाणार नाहीत. मात्र, शहराच्या हिताच्या अत्यंत मोठ्या प्रकल्पांसाठी गरज पडल्यास १५०० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींचा वापर करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने घेतला जाईल.'' असे बारणे यांनी सांगितले. विविध विभागांसाठी तसेच विविध प्रकल्पांच्या तरतूदीची माहिती बारणे यांनी यावेळी दिली.